राज्यातील ड्रग्स कारवायांभोवती पुन्हा एकदा राजकीय वादळ निर्माण झालं आहे. सातारा जिल्ह्यातील सावरी गावात झालेल्या मोठ्या ड्रग्स कारवाईवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि राज्य यंत्रणेवर खळबळजनक आरोप केले आहेत. ही पत्रकार परिषद केवळ राजकीय हेतूने नाही, तर “राज्याच्या भविष्याशी निगडित” असल्याचं सांगत अंधारेंनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं असतानाही एफआयआर (FIR) सार्वजनिक का करण्यात आली नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. “एफआयआर हे पब्लिक डॉक्युमेंट आहे. मग ते ऑनलाइन का टाकण्यात आलं नाही? पोलिसांनी जी प्रेस नोट काढली, त्यात तीन महत्त्वाची नावं का टाळली गेली?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
नावं लपवण्यामागे नेमकं काय?
अंधारेंनी विचारलेले प्रश्न केवळ प्रक्रियात्मक नव्हते, तर सत्तेच्या केंद्राला थेट धक्का देणारे होते. “कायम नजर सय्यद, राजिकुल खलीलूल रहेमान यांची नावं या प्रकरणातून का गायब आहेत? ही नावं समोर येऊ दिलीच नाहीत,” असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, ही पत्रकार परिषद कोणत्याही पक्षाच्या चौकटीत अडकलेली नाही, तर ती राज्याच्या सुरक्षिततेशी आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित आहे. याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना थेट आवाहन केलं. “मला सुरक्षेची हमी द्यावी. राजकारण बाजूला ठेवून नागरिक म्हणून माझ्या पाठीशी उभे राहावेत,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भीती आणि अनुभवांचा उल्लेख
आपल्या वक्तव्यात अंधारेंनी याआधीच्या घटनांचाही संदर्भ दिला. “उके यांनी जेव्हा भूमिका मांडली होती, तेव्हा त्यांच्यावर रेड टाकण्यात आली. नवाब मलिक यांच्या बाबतीत काय घडलं, हे राज्याने पाहिलं आहे. त्यामुळे मलाही काळजी वाटते,” असं त्या म्हणाल्या. या शब्दांमधून त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्यांवर होणाऱ्या कारवायांची भीती व्यक्त केली.
13 तारखेला काय घडलं?
अंधारेंनी दिलेल्या माहितीनुसार, 13 तारखेला सकाळी सावरी गावात ड्रग्सविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. याच काळात वर्धा, मुलुंड आणि पुणे येथेही स्वतंत्र कारवाया झाल्या. साताऱ्यापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरी गावात झालेल्या कारवाईची माहिती त्यांनी स्वतः तपासल्याचं सांगितलं. “मी त्या गावात जाऊन आले आहे. एकेक गोष्ट पाहिली आहे,” असं ठामपणे सांगत त्यांनी या कारवाईत तब्बल 45 किलो ड्रग्स जप्त करण्यात आल्याचा दावा केला. या ड्रग्सची अंदाजे किंमत 115 कोटी रुपये इतकी असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
मुंबई पोलिस साताऱ्यात का?
या प्रकरणात आणखी एक संशयास्पद बाब म्हणजे कारवाई कोणी केली, हा मुद्दा. “साताऱ्यात जाऊन मुंबई पोलिसांनी का कारवाई केली?” असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला. आत्मजीत सावंत या पोलीस अधिकाऱ्याने ही कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय, या कारवाईदरम्यान रणजीत शिंदे नावाचा एक व्यक्ती फरार झाल्याचाही आरोप त्यांनी केला. “हा रणजीत शिंदे युवसेनेचा तालुका प्रमुख असून शिंदे यांच्या गावाचा सरपंच आहे,” असं सांगत त्यांनी प्रकरणाला आणखी राजकीय वळण दिलं.
परप्रांतीय आणि बांगलादेशी कनेक्शन?
अंधारेंनी पुढे सांगितलं की, या ठिकाणी आणखी तीन लोक राहत होते – कायम सय्यद, हाबीजुल इस्लाम आणि खालील रेहमान. “हे लोक आसाममधून कसे आले? त्यांना कोणी आणलं? या रॅकेटमध्ये बांगलादेशी लोकही होते,” असा दावा करत त्यांनी सुरक्षा यंत्रणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “या सगळ्यांवर कोणी प्रश्न का विचारत नाही?” असा थेट सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
एफआयआर लपवण्याचा आरोप
या संपूर्ण प्रकरणात एफआयआर समोर न आणणं हे सर्वात गंभीर असल्याचं अंधारेंचं म्हणणं आहे. त्यांनी थेट साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांचं नाव घेत आरोप केला की, “माहिती लपवली जात आहे. का लपवली जातेय ही माहिती? हे लोक तिथे नेमकं काय काम करत होते? तिथे का राहत होते?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. अंधारेंनी आणखी एक धक्कादायक दावा केला की, या तीन लोकांना जेवण हे प्रकाश शिंदे यांच्या हॉटेलमधून पुरवलं जात होतं. “या सगळ्या प्रकरणात एफआयआर समोर येऊ दिली नाही,” असं ठामपणे त्या म्हणाल्या.
राजकीय वादाला नवं वळण
सुषमा अंधारे यांच्या या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. ड्रग्ससारख्या गंभीर विषयात सत्ताधारी नेत्यांच्या नातेवाईकांची नावं येणं, एफआयआर लपवली जाण्याचा आरोप आणि पोलीस कारवाईवर उपस्थित झालेले प्रश्न, या सगळ्यामुळे सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. आता या आरोपांवर सरकार, पोलीस प्रशासन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. ड्रग्स प्रकरणातील सत्य बाहेर येणार की हे प्रकरण राजकीय आरोप-प्रत्यारोपांतच अडकून राहणार, हे येणारा काळच ठरवेल.
रिसॉर्ट, शेड आणि शिंदे आडनाव
या प्रकरणात सर्वाधिक खळबळ माजवणारा मुद्दा म्हणजे संबंधित मालमत्तांची मालकी. सुषमा अंधारे यांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी ही कारवाई झाली, तिथे असलेला रिसॉर्ट हा प्रकाश शिंदे यांच्या मालकीचा आहे. विशेष म्हणजे प्रकाश शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “ज्या शेडमध्ये ड्रग्स सापडले, ती गोविंद शिंदकर यांच्या मालकीची आहे. ओमकार डीगे याच्याकडे त्या शेडची चावी होती. त्याला अटक करून नंतर सोडून देण्यात आलं,” असा आरोप त्यांनी केला.