एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे या वादग्रस्त वक्तव्यामुळे अधिक चर्चेत आल्या आहेत. निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्रात जाहीर निषेध करण्यात आला. मात्र आता पक्षाची आणि पक्षप्रमुखांची बदनामी केल्याप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे अधिक आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे बदनामीकारक वक्तव्य केलं होतं.
अशातच हे प्रकरण आता न्यायालयापर्यंत गेलं असून या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ॲड. असीम सरोदे यांच्यातर्फे डॉ. नीलम गोऱ्हे यांना हा नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई होणार ? तसेच नीलम गोऱ्हे या नोटीसला कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सुषमा अंधारेंनी निलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा देखील केला आहे. सात दिवसाच्या आत नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात पक्षाची आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे.