बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुखे हत्येप्रकरणी निलंबित करण्यात आलेला पीएसआय रणजित कासले याचा आणखी एक व्हिडिओ प्रसार माध्यमांसमोर आला आहे. कालपर्यंत पोलिसांना मला पकडून दाखवा असं आव्हान करणाऱ्या रणजित कासले यांनी आता शरणागती पत्करली आहे. या व्हिडिओत बीड पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती कासलेंनी दिली.
"सगळ्यांना रामकृष्ण हरी मित्रांनो, कालपर्यंत मी काही व्हिडीओ शेअर केले. त्यानतंरही मी माझ्या काही पत्रकार, वकील आणि माझ्या काही पोलीस मित्रांशी चर्चा केली. त्या सर्व मित्रांनी मला लपून राहून असे व्हिडीओ शेअर करणं योग्य नाही, असा सल्ला दिला. त्यानंतर आता मी पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी आजपर्यंत सर्व संकटांचा धैर्याने सामना केला आहे. त्यामुळे मी महाराष्ट्र पोलिसांना, बीड पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय घेतला आहे. व्यवस्थेच्या विरोधात जाऊन जास्त दिवस लढता येत नाही. हे मला जाणवलं आहे. मी मोबाईल चालू करणार आहे. मी ज्या ज्या लोकांवर आरोप केले आहेत. ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. धनंजय मुंडे भाजपच्या वॉशिंग मशीनमधून स्वच्छ होऊन बाहेर पडणार आहेत. पण यात बळी तर माझाच जाणार आहे. माझ्याविरूद्धच गुन्हे दाखल होणार आहे. त्यामुळे आता मी बीड पोलिसांसमोर हजर होणार आहे. त्यांनी मला पकडल तरी हरकत नाही. मी पोलीस खात्याचं मीठ खाल्लं आहे. त्यामुळे मी अटक झाल्यानंतरही माझी लढाई लढतच राहणार. मी जे काही आरोप केले ते सिद्ध करूनच दाखवणार आहे. गुड बाय मित्रांनो," असं कासलेंनी म्हटलं आहे.