ताज्या बातम्या

Sanjay Raut : अजित पवारांच्या मृत्यूवर संशय, संजय राऊतांचा फडणवीसांना थेट सवाल

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी झालेल्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

Published by : Varsha Bhasmare

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी झालेल्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात होऊन स्फोट झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तत्काळ प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हा अपघात असून त्यामागे कोणताही घातपात नसल्याचे स्पष्ट केले होते.

मात्र, अपघातानंतर काही दिवस उलटल्यानंतर या मृत्यूबाबत विविध शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. अजित पवारांचे कुटुंबीय, निकटवर्तीय मित्र, सहकारी तसेच काही राजकीय नेत्यांनी या प्रकरणात संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे खासदार बजरंग सोनावणे यांनी तर थेट अजित पवारांच्या विमानात बॉम्ब ठेवण्यात आला होता का, असा सवाल उपस्थित केला. यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मृत्यूचे राजकारण करू नये, असा इशारा दिला. त्यांच्या या भूमिकेवर शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, “अजित पवारांचे कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांना जर काही शंका असतील, तर त्यावर चर्चा होणे स्वाभाविक आहे. मग मुख्यमंत्री आणि भाजप नेतृत्वाला वेदना का होतात?”

राऊत यांनी पुढे स्पष्ट शब्दांत प्रश्न उपस्थित केला की, “संशय व्यक्त केल्यावर धमकी देण्याचं कारण काय? तुमचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का?” त्यांनी असा आरोप केला की, संशयाचे निराकरण करण्याऐवजी सरकार दबावाच्या भाषेत बोलत आहे. अजित पवारांचे निकटवर्तीय आमदार अमोल मिटकरी, माजी मंत्री छगन भुजबळ तसेच कुटुंबातील सदस्य रोहित पवार यांनीही शंका व्यक्त केल्याचे राऊत यांनी नमूद केले.

केंद्र सरकारच्या भूमिकेवरही संजय राऊत यांनी अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत असताना विरोधक आंदोलन करतात, तेव्हा सरकारकडून त्यांच्या हत्येचा कट होता, असे संशय व्यक्त केले जातात. तेव्हा ते राजकारण ठरत नाही का? मग आमचा एक नेता मृत्युमुखी पडतो, तेव्हा आम्ही प्रश्न विचारले तर ते राजकारण कसे ठरते?”

अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून सामान्य जनतेला हा अपघात पचनी पडलेला नाही, असेही राऊत म्हणाले. अशा मोठ्या घटनांनंतर विविध कंगोरे पुढे येतात आणि प्रश्न उपस्थित होतात, हे स्वाभाविक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. अजित पवारांच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या संशयाचे निरसन होईपर्यंत हा मुद्दा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा