जगभरातील अनेक देश सध्या आपल्या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये लक्षणीय वाढ करत आहेत. या पार्श्वभूमीवर तैवानने देखील 'टिएन किंग-4' (Tien Kung-4) या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. २०२६ पासून हे जमिनीवरून हवेत मारा करणारे (Surface-to-Air) क्षेपणास्त्र प्रत्यक्षात उत्पादनात येणार आहे.
तैवानमधील चुंगशान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (CSIST) या संस्थेने 'टिएन किंग-4' प्रणाली विकसित केली असून ती 'टिएन किंग-3' ची अद्ययावत आवृत्ती आहे. ही प्रणाली विशेषतः चीनकडून येणाऱ्या क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना अडवण्यासाठी डिझाइन केली गेली आहे. याची मॅक्सिमम एंगेजमेंट उंची सुमारे 70 किलोमीटर असून, हे PAC-3 आणि टिएन किंग-3 यांच्यापेक्षा अधिक क्षमतेचे मानले जाते.
तैवानच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, सरकारने एकूण १२२ क्षेपणास्त्र पॉड्स खरेदी करण्याची योजना आखली आहे. यापैकी ४६ पॉड्स २०२६ मध्ये वितरित होतील, तर उर्वरित ७६ पॉड्स २०२७ मध्ये येणार आहेत. प्रत्येक पॉडमध्ये एक क्षेपणास्त्र असेल.
या क्षेपणास्त्राची गती अधिक असून ते हवेत अत्यंत वेगाने आणि चपळतेने हालचाल करणाऱ्या लक्ष्यांनाही अचूकपणे लक्ष्य करू शकते. यामध्ये अॅक्टिव्ह रडार गाईडन्स आणि इर्शियल मिडकोर्स मार्गदर्शन प्रणाली आहे, ज्यामुळे मिड-फ्लाइट अपडेट्स मिळतात. नाकाच्या भागात मायक्रोवेव्ह सिकर बसवण्यात आले असून तो अंतिम टप्प्यात लक्ष्याचा शोध घेतो.
यामुळे तैवानची हवाई संरक्षण प्रणाली आणखी बळकट होणार असून, चीनला यामुळे सामरिक दृष्टीने दबाव जाणवण्याची शक्यता आहे.