कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. चीन सह इतर काही देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढला आहे. चीन, ब्राझीलमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. काही महिन्यांपूर्वी दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा लाखांवर पोहोचला होता. आतापर्यंत देशात 4 कोटी 46 लाख 76 हजार 199 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर एका माध्यमाशी बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यातील आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या तसेच योग्य त्या उपायोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोरोनाबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच राज्यात कोरोना आला तरी लॉकडाऊनची शक्यता नाही. सध्या तरी मास्क वापरण्याची सक्ती केलेली नाही. पण नागरिकांनी मास्क वापरावे असे आवाहन आम्ही करत आहोत.असे तानाजी सावंत यांनी सांगितले.