तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे आपल्या दैनंदिन जीवनातील उपकरणे अधिक स्मार्ट बनत चालली आहेत. स्मार्टफोन आणि टॅबलेट्सनंतर आता स्मार्टवॉचेसमध्येही कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) अधिक प्रभावीपणे वापरली जाईल. याच पार्श्वभूमीवर, Google ने आपल्या Galaxy Watch यूजर्ससाठी एक महत्त्वाचा बदल आणण्याची तयारी केली आहे. लवकरच Google Assistant ची जागा Gemini AI घेणार आहे. Gemini AI ही Google ने विकसित केलेली एक अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली आहे, जी नैसर्गिक भाषेतील संवाद समजून घेते आणि वापरकर्त्याच्या गरजांनुसार वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करते.
Google Assistant च्या तुलनेत Gemini अधिक बुद्धिमान, संवादक्षम आणि वैयक्तिकृत अनुभव देणारी AI आहे. Galaxy वॉचसाठी नवीन अपडेट काय आहे? गेल्या वर्षी Google ने Android स्मार्टफोन आणि टॅबलेट्ससाठी Google Assistant ची जागा Gemini ने घेतली होती. मात्र, Wear OS वर आधारित स्मार्टवॉचेस आणि Nest डिव्हाइसेससाठी हा बदल लागू करण्यात आलेला नव्हता. आता मिळालेल्या माहितीनुसार, Galaxy Watch 4, 5, आणि 6 सीरिजसारख्या Wear OS आधारित वॉचेसमध्ये लवकरच Gemini AI येणार आहे.
Google च्या एका अलीकडील अपडेटमध्ये (Google Assistant App v1.18.x for Wear OS), काही कोड स्ट्रिंग्ज सापडल्या आहेत, ज्या Gemini AI च्या या नवीन अपडेटची पुष्टी करतात. या स्ट्रिंग्जमध्ये असे उल्लेख आढळले. "Gemini वापरायला सुरूवात करा: नैसर्गिक भाषेत बोला आणि तुमच्या घड्याळावर वैयक्तिक AI सहाय्यकाच्या मदतीने अधिक कामे पार पाडा".
"तुम्ही आधीच फोनवर Gemini वापरत आहात आणि आता तेच असिस्टंट फिचर तुमच्या वॉचवरही उपलब्ध आहे". Galaxy वॉचवर Gemini AI सक्रिय करण्यासाठी, वापरकर्ते साइड बटण काही वेळ दाबून ठेवू शकतात किंवा "Hey Google" किंवा "Okay Google" असे बोलूनही AI सह संवाद साधू शकतात, यासाठी हे व्हॉइस ट्रिगर फीचर सुरू केलेले असणे आवश्यक आहे.
Gemini AI कशासाठी वापरता येईल?
अलार्म लावणे
टाइमर सेट करणे
मेसेजेस पाठवणे
हवामानाची माहिती घेणे
कॅलेंडर तपासणे
वैयक्तिक सल्ले किंवा आठवणी सेट करणे आणि भविष्यात या AI च्या मदतीने अजूनही स्मार्ट फिचर्स उपलब्ध होतील. सद्यस्थितीत Google ने अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेले नाही, मात्र या नवीन कोड स्ट्रिंग्जचा उल्लेख येणाऱ्या अपडेटमध्ये दिसत असल्याने, लवकरच हा बदल रोलआउट होण्याची शक्यता आहे. काही वापरकर्त्यांना बीटा स्वरूपात हे फीचर उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
Gemini AI चा Galaxy Watch मध्ये समावेश म्हणजे Google Wear OS साठी एक मोठं पाऊल आहे. यामुळे वॉच यूजर्सना अधिक स्मार्ट, वैयक्तिक आणि संवादक्षम अनुभव मिळणार आहे. हे फिचर केवळ तांत्रिकदृष्ट्या नव्हे तर वापरकर्त्याच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.