थोडक्यात
पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार
हवामान विभागाचा अंदाज काय?
रब्बी पेरण्यांना पोषक वातावरण
गेल्या 15 ते 20 दिवसांपासून राज्यात परतीचा पाऊस आणि त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झालं होतं. अजूनही काहींमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असली तरी आता तापमानामध्ये घट होण्यास सुरुवात होणार असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलय. गेल्या काही आठवड्यांपासून अधून मधून सुरू असलेल्या पावसानंतर अखेर मुंबईसह, विदर्भ मराठवाड्यात थंडीची चाहूल लागणार आहे.
भारतीय व हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि उपनगरांमध्ये 6 ते 7 नोव्हेंबरपासून तापमान 4 ते 5 अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. हवामानात त्यामुळे स्पष्ट बदल जाणवेल. (IMD Forecast) मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण व गोवा भागात मात्र पुढील 24 तासात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
भारतीय हवामान केंद्राने जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, पुढील दोन दिवसात किमान तापमान दोन ते चार अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरावर गुंगावणाऱ्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती धूसर होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता हवामान कोरडे होण्यास सुरुवात होणार आहे. पुढील 24 तासात महाराष्ट्रात किमान तापमान दोन ते तीन अंशांनी घटणार असून पाऊस उतरणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून मुंबई उपनगरासह कोकणपट्टी व दक्षिण मध्य महाराष्ट्राला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. हवेत आर्द्रता व ओलावा कायम होता. दरम्यान, आज (6 नोव्हेंबर ) मुंबई ,ठाणे, रायगडसह मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. 7 नोव्हेंबरपासून हवामान शुष्क होत जाणार असून पुढील दोन दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मुंबईत अंशतः ढगाळ हवामान राहणारा असून दिवसा उखाडा जाणवेल. पहाटेच्या वेळी हवेत गारवा राहील.
रब्बी पेरण्यांना पोषक वातावरण
राज्यभरात पावसाचा जोर ओसरला असून आता हवामान शुष्क व कोरडे होण्यास सुरुवात होणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठे नुकसान झाले. राज्यभरातील रब्बी पेरण्या खोळंबल्या. आता पेरण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्यास सुरुवात होणार आहे.