थोडक्यात
अहिल्यानगरमध्ये मुस्लीम धर्मगुरुंच्या नावाची रांगोळी काढून त्याची विटंबना करण्यात आली.
यानंतर रविवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेविरोधात आंदोलकांनी छत्रपती संभाजीनगर–पुणे महामार्गावर रास्ता रोको करून आंदोलन केले.
याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अहिल्यानगरमध्ये मुस्लीम धर्मगुरुंच्या नावाची रांगोळी काढून त्याची विटंबना करण्यात आल्याने रविवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेविरोधात आंदोलकांनी छत्रपती संभाजीनगर–पुणे महामार्गावर रास्ता रोको करून आंदोलन केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी सध्या कार्यक्रम व प्रवासात असल्यामुळे संपूर्ण माहिती माझ्याकडे आलेली नाही. प्राथमिक माहिती मिळाली आहे. संपूर्ण तपास करूनच यावर बोलेन. महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा काही प्रयत्न सुरू आहे का, हे शोधावे लागेल. असे प्रयत्न जाणीवपूर्वक होत असावेत आणि त्यामागील सूत्रधार शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.”
फडणवीस पुढे म्हणाले की, मुंबई, वसईसह काही ठिकाणी अशा प्रकारचे पोस्टर किंवा कृती झाल्याचे दिसून आले आहे. “लोकसभा निवडणुकीपूर्वी जसे काही प्रयत्न झाले, त्याच धर्तीवर समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का, याकडे लक्ष द्यावे लागेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागातील बारातोटी कारंजा येथे ही घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. आंदोलकांना पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलन सुरूच राहिल्याने वाहतूक ठप्प झाली. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगवला.