थोडक्यात
...तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी आम्ही संबंध तोडू
नारायण राणेंचा थेट इशारा
नारायण राणेंची ठाकरे बंधूंवर टीका
शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Eknath Shinde Faction) आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट (Shiv Sena Uddhav Thackeray Faction) सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “शहर विकास आघाडी” या नावाने दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढविण्याची चर्चा रंगली आहे. याच संदर्भात कणकवली शहरात नुकतीच गुप्त बैठक झाली होती. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, तसेच सुशांत नाईक, संदेश पारकर आणि सतीश सावंत हे स्थानिक नेते उपस्थित होते. या बैठकीत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी दोन्ही गटांनी एकत्र येण्याची शक्यता तपासण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आता या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाला थेट इशारा दिलाय.
गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात गाठीभेटी वाढल्या आहेत. आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले की, अनेक बातम्या येत आहेत. बंधूंच्या भेटी होत आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्या दौऱ्यात सरकारवर आरोप करत आहेत. आता ते बोलत आहेत. ते मुख्यमंत्री असताना काय केलं? सगळं अस्तित्व संपलं. अस्त्र पण संपत चाललंय. ते संपू नये, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्या आजारपणावर टोला लगावला. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी राज आणि उद्धव बोलतात. सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांची नाही. जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा मुंबई काय होती आणि आता काय होतेय ते बघावं, असे नारायण राणेंनी ठाकरे बंधूंवर टीका केली.
नेमकं काय म्हणाले नारायण राणे?
नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी सिंधुदुर्गमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले की, अस झालं तर एकनाथ शिंदे शिवसेनेचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही संबंध तोडू. विशाल परब आणि राजन तेली यांना मी मनात नाही. मी त्यांना नेहमी विरोध करीन. प्रतिष्ठित नागरिकात राजन तेली बसत नाही. सर्वांनी टाकून दिलेलं एकनाथ शिंदे का जमा करतोय? असे निशाणा त्यांनी राजन तेली यांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून केला. तर विशाल परब मला भेटू दे मग तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल, असे देखील नारायण राणे म्हणाले. तसेच, जिल्ह्यात युती व्हावी, असं मी म्हणतोय. जागा वाटप उद्या ठरेल, असे त्यांनी त्यांनी सांगितले.