महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. तब्बल २८६९ जागांसाठी ही निवडणूक होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रचाराला जोर आला असून ठिकठिकाणी सभा, रॅली, रोड शो आणि पदयात्रांचे आयोजन करण्यात येत आहे.
या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा राजकीय घडामोड म्हणजे ठाकरे बंधूंचे एकत्र येणे. नाशिकमध्ये पहिली संयुक्त सभा पार पडल्यानंतर आता आज मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची पहिली राजकीय सभा होणार आहे. ही सभा केवळ मुंबईपुरतीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या सभेकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवाजी पार्क हे ठाकरे कुटुंबासाठी भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मैदान मानले जाते. त्यामुळे या ठिकाणाहून होणारी सभा अनेक संकेत देणारी ठरू शकते.
या सभेतून ठाकरे बंधू सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आगामी रणनिती, स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि मुंबईकरांचे प्रश्न यावरही भाष्य होण्याची शक्यता आहे. विशेषतः सध्याच्या सत्ताधारी युतीवर कोणत्या मुद्द्यांवर निशाणा साधला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या या एकत्रित सभेमुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुंबईच्या राजकारणात ही सभा नवे समीकरण तयार करणार की जुने राजकीय समीकरणे बदलणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंची ही सभा महत्त्वाचा टप्पा ठरण्याची चिन्हे आहेत.