Uddhav Thackeray Group Dasara Melava 2025 : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा दसरा मेळावा चर्चेत आला आहे. शिवसेनेच्या या परंपरागत मेळाव्याला यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कवर रंगणार आहे. गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या भेटींमुळे दोन्ही पक्षांमध्ये संभाव्य युतीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे या दसऱ्याला दोन्ही भाऊ एकत्र व्यासपीठावर दिसतील का? हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे.
गेल्या काही महिन्यांत ठाकरे बंधूंच्या नात्यातील उब पुन्हा दिसू लागली आहे. आधी मराठी भाषेसाठी आयोजित मेळाव्यात दोघेही एकत्र आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे गणेशोत्सवात उद्धव ठाकरे कुटुंबासह राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले. या भेटींमुळे दोन्ही कुटुंबांतील संवाद वाढल्याचे दिसून आले आणि राजकीय वर्तुळात युतीबाबत तर्क-वितर्क सुरू झाले.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा तब्बल 58 वर्षांची आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात कार्यकर्त्यांना दिशा देणारा हा मेळावा आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. या वेळी देखील महापालिका निवडणुकांचा प्रचार सुरू करण्याचा नारळ याच व्यासपीठावर फुटेल अशी अपेक्षा आहे. मात्र, यावेळी राज ठाकरे उपस्थित राहतील का, यावर अद्याप स्पष्टता नाही.
खासदार संजय राऊतांनी संकेत दिले आहेत की, दसऱ्याच्या निमित्ताने दोन्ही भावांमध्ये वैचारिक संवाद होऊ शकतो. मात्र, मनसेकडून अंतिम निर्णय राज ठाकरेच घेतील, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबरला दोन ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसणार का, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळ आणि जनतेचेही लक्ष लागले आहे.