ठाकरे गटाची शिवसेना आता अधिक आक्रमक पवित्र्यात आली आहे. शहरात गुरुवारी झालेल्या घटनांनी याचा प्रत्यय आला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयसवाल यांच्या घरात घुसून त्यांना प्रश्न केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कार्यकर्त्यांनी "क्या हुआ तेरा वादा?" असा सवाल करत, जयसवाल यांच्यावर प्रहार केला. "तुम्ही जनतेला दिलेली वचने पूर्ण झालीत का?" असा जाब विचारताना कार्यकर्त्यांनी संतप्त नाराजी व्यक्त केली.
याच दिवशी भाजपाच्या शहर कार्यालयातही ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रवेश करत एक निवेदन दिलं. या निवेदनातून त्यांनी भाजप आणि सत्ताधारी नेत्यांनी जनतेला दिलेली आश्वासने आठवून दिली. "सत्तेवर आल्यावर जे जे वचन दिलं गेलं, ते आज विसरलं गेलंय. आम्ही स्मरणपत्र घेऊन आलो आहोत," असे दानवे म्हणाले. ठाकरे गटाच्या या आंदोलनाचा उद्देश स्पष्ट आहे. जनतेसमोर सत्ताधाऱ्यांची विसरलेली वचने पुन्हा मांडणे आणि त्यांना जबाबदार धरणे. शिंदे गटाच्या आमदाराला घेराव घालण्याचा प्रकार आणि भाजप कार्यालयात निवेदन सादर करणं या दोन्ही घटनांनी शिवसेनेचा दबाव तंत्र पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
या घडामोडींमुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची ही मोहीम सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते.