Anil Parab On Ramdas Kadam Balashaeb Thakercy Dead Body Statment : शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर आता ठाकरेंच्या शिवसेनेतून प्रत्युत्तर येणार आहे. उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी आणि माजी मंत्री अनिल परब शनिवारी पत्रकार परिषद घेणार असून, या परिषदेत ते कदमांच्या सर्व आरोपांना उत्तर देतील. याशिवाय, बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्राबाबतही अनिल परब महत्त्वपूर्ण खुलासा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कदमांचे गंभीर आरोप
रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात दावा केला की, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस घरात ठेवण्यात आला होता. त्या वेळी उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले, असं ते म्हणाले. एवढंच नव्हे तर ही माहिती स्वतः उद्धव ठाकरेंनीच आपल्याला दिल्याचा दावाही कदम यांनी केला.
कदमांनी पुढे सांगितले की, “बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले गेले, याचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी द्यावं.” त्यांनी ठाकरेंवर थेट निशाणा साधत स्वतःची आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. “आपण भाषणाच्या ओघात नाही तर सत्य सांगतो आहोत,” असा पुनरुच्चारही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
शरद पवारांचाही उल्लेख
रामदास कदम यांनी आपल्या आरोपांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही उल्लेख केला. “बाळासाहेबांचा मृतदेह घरात ठेवण्यासंबंधी त्यावेळी शरद पवारांनी आक्षेप घेतला होता आणि ते स्वतः याचे साक्षीदार आहेत,” असा दावा त्यांनी केला.
अनिल परबांचा प्रतिहल्ला अपेक्षित
या सर्व आरोपांना उत्तर देण्यासाठी अनिल परब शनिवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. ते आरोपांचे खंडन करण्याबरोबरच बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राबाबत ठोस भूमिका मांडतील, अशी माहिती आहे. त्यामुळे नेमका काय खुलासा केला जाणार, याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे.
राजकीय वातावरण तापणार
रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांमुळे ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. दसरा मेळाव्यात कदमांनी केलेल्या वक्तव्यावरूनच वादंग सुरू झाला होता. त्यानंतरही त्यांनी पत्रकार परिषदेत आपला आरोप कायम ठेवल्याचं स्पष्ट केलं. आता अनिल परब काय उत्तर देतात, उद्धव ठाकरेंविषयी झालेले आरोप ते कसे फेटाळून लावतात आणि बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राबाबत कोणती नवी माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.