‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरते आहे. सायली, अर्जुन आणि पूर्णा आजी ही पात्रं विशेष गाजली. पूर्णा आजींची भूमिका दिवंगत ज्योती चांदेकर यांनी केली होती. त्यांच्या सहज अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. पण त्यांच्या निधनानंतर मालिकेतील त्यांचं अनुपस्थिती चाहत्यांना जाणवत होती.
मात्र आता या मालिकेत नवी पूर्णा आजी येणार असल्याची बातमी समोर आली आहे. नुकताच या नव्या पूर्णा आजींचा प्रोमो सोशल मीडियावर झळकला असून, त्यात त्या सुभेदारांच्या घरी येताना दाखवलं आहे. त्यांच्या आगमनाने मालिकेतील कलाकारही आनंदी झाल्याचं पाहायला मिळतंय.
हा प्रोमो पाहून अनेक चाहत्यांनी कमेंटमध्ये नव्या पूर्णा आजींचं नाव ओळखलं असून, काहींनी त्या रोहिणी हट्टंगडी असाव्यात, असं म्हटलं आहे. काहींनी त्यांच्या जुन्या भूमिकांची आठवण करून दिली, तर काहींनी म्हणलं, "अंगावर काटा आला, वाटलं जुनी पूर्णा आजीच परत आली." सध्या प्रेक्षक नव्या पूर्णा आजींच्या प्रवेशासाठी खूप उत्सुक आहेत. त्यांच्या येण्याने कथानक कसं वळण घेणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.