१९ फेब्रुवारीला सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेनुसार साजरी करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहेत. अशा या रयतेच्या राजाने आतापर्यंत जिंकलेले गडकिल्ले अनेकांनी सर केले आहेत. आजच्या पिढीला स्वराज्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची माहिती असणे आवश्यक आहे.
अशातच पुण्यातून अवघ्या 1 वर्षाच्या चिमुकलीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेत, तिने महाराजांचे तीन प्रसिद्ध किल्ले यशस्वीपणे सर केले आहेत. राजवर्धिनी प्रसाद चव्हाण या 1 वर्षाच्या चिमुकलीने सिंहगड, शिवनेरी आणि रायगड या तीन गडावर आपले भीम पराक्रम दाखवले आहे ज्यामुळे तिच्यावर शिवभक्तांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, या वयात मुल धड चालायला देखील शिकत नाही आणि राजवर्धिनीने ही अविश्वसनिय कामगिरी केली आहे.
राजवर्धिनीच्या साहसी प्रवासाची सुरुवात
राजवर्धिनीचे वडीलांनी आतापर्यंत 400 हून अधिक ट्रेकिंग केल्या आहेत. ते एक अनुभवी ट्रेकर असून त्यांनी पुणे ते रायगड पायी जाण्याची मोहीमसुद्धा फत्ते केली आहे. तिच्या वडीलांच्या याच प्रेरणेतून राजवर्धिनीलाही लहान वयातच किल्ले सर करण्याची आवड निर्माण झाली असावी. राजवर्धिनीने सिंहगडापासून गडकिल्ले सर करण्याचा निर्धार केला. ज्यावेळेस तिला तिचे कुटुंब सिंहगडावर घेऊन गेले. त्यावेळेस ती गडाच्या पायथ्याशी पोहोचताच कडेवरून उतरून स्वतःच किल्ला चढायला लागली.
तिची छोटी छोटी पाऊले टाकत तिने सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. या एवढ्याशा राजवर्धिनीने तिच्या बालवयात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, किल्ले शिवनेरी, त्याच सहजतेने सर केले. तिचा आत्मविश्वास आणखी बळकट झाला आणि तिचे कुटुंब तिला रायगड किल्ल्यावर घेऊन गेले.
रायगडावर तिने "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या घोषणा ऐकत महाराजांचे तीन लोकप्रिय आणि प्रसिद्ध किल्ले चढायला सुरुवात केली. किल्ला चढून महाराजांच्या समाधीवर माथा टेकवत तिने आशीर्वाद घेतले. राजवर्धिनीसारख्या चिमुकलीने घेतलेली प्रेरणा खरंच आदर्शवत आहे. तिच्या या कामगिरीमुळे ती महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची ट्रेकर म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.