बारामती येथे विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि अदानी समूहाच्या कार्याचा उल्लेख करत कौतुक केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) केंद्राचे उद्घाटन करण्यात आले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
भाषणात अजित पवार म्हणाले की, अदानी समूहाने केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती केली आहे. उद्योगविकासाबरोबरच सामाजिक जबाबदारी (CSR) या संकल्पनेला त्यांनी प्राधान्य दिले असून, शिक्षण, आरोग्य सेवा आणि गरिबांसाठी मोफत उपचार अशा अनेक क्षेत्रांत अदानी समूहाने भरीव योगदान दिले आहे. विशेषतः आरोग्य क्षेत्रात गरीब व गरजू रुग्णांसाठी सुरू केलेल्या उपक्रमांमुळे लाखो लोकांना दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू झालेल्या या नव्या एआय केंद्रामुळे बारामतीसह संपूर्ण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले जाणार आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीही जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील, यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. भाषणाच्या शेवटी त्यांनी बारामतीकरांशी आपुलकीच्या शब्दांत संवाद साधला.
बारामतीकरांकडून नेहमीच पाठिंबा मिळतो, पण कधी कधी “चिमटे”ही मिळतात, असा उपरोधिक उल्लेख करत सभागृहात हास्यकल्लोळ निर्माण झाला. मात्र, या टीकाही आपल्याला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देतात, असे सांगत अजित पवार यांनी बारामतीचा नावलौकिक देश-विदेशात वाढवण्याचे आश्वासन दिले. एकूणच, शिक्षण, तंत्रज्ञान आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधणारे हे एआय केंद्र भविष्यातील पिढीसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.