फेब्रुवारी 2021 मध्ये आंग सान सू की यांच्या निवडून आलेल्या सरकारकडून सत्ता बळकावल्यानंतर म्यानमारमध्ये अस्थिरता सुरूच आहे. शांततापूर्ण निदर्शनांवर घातक बळाचा वापर झाल्यानंतर विरोधकांनी शस्त्रे उचलली आणि यादवी युद्धाचे स्वरूप अधिक तीव्र झाले.
गुरुवारी रात्री 8:30 वाजता मांडले शहराच्या ईशान्येला सुमारे 115 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोगोक टाउनशिपच्या श्वेगु वॉर्डवर सेनेने हवाई हल्ला केला. तांग नॅशनल लिबरेशन आर्मी (TNLA) चे प्रवक्ते लवे याय ऊ यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात किमान 21 नागरिक ठार झाले, 7 जखमी झाले. मृतांमध्ये एका गर्भवती महिलेसह 16 महिलांचा समावेश होता. याशिवाय 15 घरे आणि बौद्ध मठांचेही मोठे नुकसान झाले.
स्वतंत्र माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या फोटोंनुसार मृतांचा आकडा प्रत्यक्षात 30 वर पोहोचला असण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिकांनीही मृतांची संख्या अधिक असल्याचे सांगितले, मात्र सेनेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. यापूर्वीही सेनेने स्वतःचे हल्ले “वैध युद्ध ठिकाणांवर” झाल्याचे सांगत प्रतिकार गटांना दहशतवादी ठरवले आहे.
टीएनएलए हा चीनी सीमेजवळ सक्रिय असलेला शक्तिशाली जातीय मिलिशिया आहे. जुलै 2024 मध्ये त्याने मोगोकमधील मौल्यवान माणिक खाण केंद्रावर कब्जा मिळवला होता. हा गट इतर जातीय मिलिशियांसोबत मिळून ईशान्य म्यानमारचा मोठा भाग ताब्यात घेत आहे.
म्यानमारमध्ये सध्या सेनेचा ताबा देशाच्या अर्ध्याहून कमी भागावर उरला आहे, तरी राजधानी नेपीता आणि मध्य भागावर त्यांची पकड कायम आहे. ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांतच झालेल्या हवाई हल्ल्यांत दोन बौद्ध भिक्षूं सहित 17 जण ठार झाले होते.
या वर्षाच्या अखेरीस निवडणुका घेण्याचे आश्वासन सेनेकडून देण्यात आले आहे. मात्र विरोधक आणि विश्लेषकांच्या मते या निवडणुका लोकशाही स्वरूपाच्या असणार नाहीत कारण बहुतेक विरोधी नेते तुरुंगात असून स्वतंत्र माध्यमांवर बंदी आहे. त्यामुळे ही निवडणूक सेनेच्या कारभाराला वैधतेचे कवच मिळवून देण्यासाठीच असल्याची टीका होत आहे.