शुक्रवारी राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि या निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भाजपची जबरदस्त लाट पाहायला मिळाली असून, भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तब्बल २९ पैकी २६ महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीने सत्ता मिळवत विरोधी पक्षांना मोठा धक्का दिला आहे. या निकालामुळे आगामी राजकीय समीकरणांवरही दूरगामी परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे.
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीला जोरदार धक्का दिला. मुंबई महापालिकेत भाजपला मोठं यश मिळालं असून भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे तब्बल ८९ उमेदवार विजयी झाले असून, शिवसेना शिंदे गटाचे २९ उमेदवार निवडून आले आहेत. या दोन्ही पक्षांच्या युतीला मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता मुंबईवर महायुतीची सत्ता निश्चित मानली जात आहे.
दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाला मुंबई महापालिकेत ६५ जागांवर समाधान मानावे लागले, तर मनसेला केवळ ६ जागा मिळाल्या आहेत. २५ वर्षांची सत्ता गमावल्यानंतर ठाकरे गटासाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा ठरला आहे. निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे सर्व विजयी उमेदवार आज मातोश्रीवर दाखल झाले आणि त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांचे मनोबल वाढवले.
मात्र, या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. “आपला महापौर झाला पाहिजे हे स्वप्न आहेच. गद्दारी करून मिळवलेला विजय मराठी माणूस कधीही माफ करणार नाही,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, “आमच्याकडे तन आणि मन आहे, तर त्यांच्याकडे फक्त धन आहे. आपल्या शक्तीच्या जोरावर आपण त्यांना घाम फोडला आहे.”
उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश देत सांगितले की, ही शक्ती अशीच एकवटून ठेवा, जेणेकरून पुढच्या पिढ्यांना अभिमान वाटेल की त्यांच्या आई-वडिलांनी किंवा भावंडांनी पैसे मिळत असतानाही आपली निष्ठा विकली नाही. “लढाई संपलेली नाही, खरी लढाई आता सुरू झाली आहे. जिद्द विकत घेता येत नाही आणि याच जिद्दीच्या जोरावर आपल्याला पुढचा विजय मिळवायचा आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या निकालांमुळे राज्यातील राजकारण अधिक तापणार असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.