राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “राज्यात भाजप गुंडांचं राज्य चालवत आहे,” असा गंभीर आरोप करत त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या मुलगा अद्याप का सापडत नाही, असा थेट सवाल उपस्थित केला.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राज्यात गंभीर गुन्हे घडत असताना आरोपींना संरक्षण दिलं जात असल्याचं चित्र दिसत आहे. “सामान्य नागरिकांच्या मुलांवर कारवाई झटपट होते, पण सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित प्रकरणांमध्ये तपासाला विलंब होतो,” असा आरोप त्यांनी केला. मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाच्या प्रकरणात पोलिस तपास संथ गतीने सुरू असल्याचं सांगत राऊतांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
राऊत पुढे म्हणाले की, कायदा सर्वांसाठी समान असायला हवा. “जर एखादा सामान्य नागरिक दोषी असेल, तर त्याच्यावर तात्काळ कारवाई होते. मग सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांच्या मुलांबाबत वेगळे निकष का?” असा सवाल त्यांनी केला. राज्यात गुन्हेगारी वाढत असून, गुंडांना अभय मिळत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं असून भाजपकडून यावर प्रत्युत्तर देण्यात येण्याची शक्यता आहे. मंत्री भरत गोगावले किंवा सरकारकडून यासंदर्भात अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.