राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये धावपळ, नाराजी आणि बंडखोरी पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले, तर काही ठिकाणी ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अशाच या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठी फूट पडल्याची बातमी समोर आली आहे.
राज्यात तब्बल १४ महानगरपालिकांमध्ये भाजप-शिवसेना (शिंदे गट) युती तुटली असून, दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. जागावाटपावरून महायुतीत मोठी रस्सीखेच झाली. काही ठिकाणी भाजपने कमी जागा मिळत असल्याने आक्रमक भूमिका घेतली, तर काही शहरांमध्ये शिंदे गटानेच युती करण्यास स्पष्ट नकार दिला. याच मतभेदांचा परिणाम म्हणून अखेर अनेक ठिकाणी युती तुटली.
पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या १४ महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिंदे गट आमनेसामने असणार आहेत. या सर्व ठिकाणी आता थेट लढत पाहायला मिळणार असून, याचा फायदा विरोधकांना होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
मात्र, युती तुटली असली तरी मुंबई आणि ठाणे या अत्यंत महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिंदे गटाने युती कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी अजित पवार गटाला महायुतीपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील लढत अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे.
राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या महापालिका भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. आता १४ ठिकाणी युती तुटल्याने महायुतीची रणनीती कितपत यशस्वी ठरते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.