ताज्या बातम्या

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : कोळी बांधवांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार! लालबागचा राजा विसर्जन वादावर मंडळाकडून पहिली कारवाई

मुंबईच्या गणेशोत्सवाचं सर्वात मोठं आकर्षण मानला जाणारा लालबागचा राजा यंदा विसर्जन प्रक्रियेमध्ये अभूतपूर्व खोळंबा अनुभवावा लागला. लालबागचा राजा विसर्जन विलंबावरून निर्माण झालेल्या वादाला आता कायदेशीर वळण मिळालं आहे.

Published by : Prachi Nate

मुंबईच्या गणेशोत्सवाचं सर्वात मोठं आकर्षण मानला जाणारा लालबागचा राजा यंदा विसर्जन प्रक्रियेमध्ये अभूतपूर्व खोळंबा अनुभवावा लागला. तब्बल 33 तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर या राजाचं विसर्जन रविवारी,7 सप्टेंबर रोजी रात्री पार पडलं. मात्र विसर्जन प्रक्रियेतील या विलंबावरून निर्माण झालेल्या वादाला आता कायदेशीर वळण मिळालं आहे.

लालबाग राजा मंडळाने गिरगाव चौपाटीचे नाखवा (मच्छीमार) हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. वाडकर यांनी माध्यमांशी बोलताना आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, “आम्ही वाडकर बंधू अनेक वर्षे लालबाग राजाचं विसर्जन करत आलो आहोत, मात्र यंदा मंडळाने गुजरातच्या कंपनीला कंत्राट दिलं आणि सगळं गणित चुकलं”, असे वक्तव्य केले होते. यासोबतच भरती-ओहोटीचा अंदाज मंडळाला आला नाही, अशी टीका देखील त्यांनी केली होती.

मात्र, या आरोपांना मंडळाने फेटाळलं आहे. मंडळाने स्पष्ट केलं की, हिरालाल वाडकर यांचा लालबाग राजा विसर्जनाशी काहीही संबंध नाही आणि कधीही त्यांनी विसर्जनाची जबाबदारी सांभाळलेली नाही. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि मंडळाची बदनामी करण्यासाठी वाडकर यांनी खोटी माहिती पसरवली, असा ठपका मंडळाने ठेवला आहे. त्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याची तयारी सुरू आहे.

विसर्जन प्रक्रियेतला खोळंबा

या वर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गुजरातमध्ये बनवण्यात आलेल्या मोटराइज्ड तराफ्याचा वापर करण्यात आला. परंतु, मूर्ती तराफ्यावर विराजमान करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट ठरली. अनेक प्रयत्नांनंतर मूर्ती सुरक्षितपणे बसवण्यात आली. त्यानंतर देखील समुद्रातील योग्य भरतीची वाट पाहावी लागली. शेवटी रात्री 9 वाजता भरतीची योग्य पातळी मिळाल्यानंतर विसर्जन पार पडले.

6 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता निघालेली विसर्जन मिरवणूक 7 सप्टेंबरच्या रात्री उशिरा अखेर गिरीगाव चौपाटीवर पूर्ण झाली. तब्बल 33 तासांच्या दीर्घ प्रतीक्षेमुळे लाखो भाविकांना संयमाची कठोर परीक्षा द्यावी लागली.

वाद आणि पुढची पावले

सोशल मीडियावर हिरालाल वाडकर यांच्या विधानांचा आधार घेत विविध अफवा पसरवल्या गेल्या. त्यामुळे विसर्जन प्रक्रियेबाबत अनावश्यक वाद निर्माण झाला. मंडळाने यासंदर्भात स्पष्ट केलं की, “लालबागचा राजा मंडळ नेहमी भाविकांच्या सोयीसाठी आणि श्रद्धेचा सन्मान राखून काम करतं. यंदाही तांत्रिक कारणांमुळे थोडा उशीर झाला, मात्र खोट्या गोष्टींना खतपाणी घालून बदनामी केली जाणं अमान्य आहे.” आता या वादाचा निकाल न्यायालयात लागणार असून, मुंबईकरांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nepal EX PM Wife Dies : नेपाळमध्ये हिंसाचार शिगेला! माजी पंतप्रधानांच्या पत्नीची जिवंत जाळून हत्या, या घटनेत झालानाथ खनाल...

Vice-Presidential Election : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर! सी.पी , राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती

Latest Marathi News Update live : एनडीएचे सी.पी. राधाकृष्णन 17वे उपराष्ट्रपती

Nepal Finance Minister Beaten By Protesters : नेपाळमध्ये आंदोलनाला हिंसक वळण! अर्थमंत्र्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, Video Viral