थोडक्यात
'मोदी'ज मिशन' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न,
मुख्ममंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मोदींचं तोंडभरुन कौतुक...
मोदींचा प्रवास खडतर आणि संघर्षाचा होता, असंही वक्तव्य.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर आधारित आणखी एक प्रेरणादायी पुस्तक वाचकांसमोर आले आहे. या नव्या पुस्तकाचं नाव आहे ‘मोदीज मिशन’, ज्याचे लेखक आहेत प्रख्यात वकील बर्जिस देसाई. रुपा पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित या पुस्तकात नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेतला आहे. वडनगरमधील साधं बालपण, हिमालयातील चिंतन आणि अखेर भारताचे पंतप्रधान बनण्यापर्यंतचा अद्भुत प्रवास या ग्रंथात रेखाटण्यात आला आहे.
या पुस्तकाचं प्रकाशन समारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे राजभवन या ठिकाणी संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “‘मोदीज मिशन’ हे पुस्तक इतरांपेक्षा वेगळं आहे कारण हे एका अशा व्यक्तीने लिहिलं आहे जी एकाच वेळी पत्रकार, लेखक आणि वकील आहे. पत्रकार सामान्यतः कोणाचं कौतुक करत नाहीत आणि वकील पुराव्याशिवाय काही लिहीत नाहीत. त्यामुळे हे पुस्तक सत्य, अभ्यास आणि दृष्टिकोन या तीनही बाबींचं उत्कृष्ट मिश्रण आहे.”
फडणवीस पुढे म्हणाले की, “लेखकाने मोदींच्या आयुष्यातील विविध टप्प्यांचा वेध घेत त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील खोली आणि तत्त्वनिष्ठता उलगडून दाखवली आहे. वयाच्या नवव्या वर्षी घरातील परिस्थितीची जाणीव असणं, हिमालयात साधना करणं आणि त्यानंतर संघाच्या कार्यात झोकून देणं, या सगळ्या टप्प्यांमधून मोदींजींनी घेतलेला आत्मसंयम आणि सेवाभाव हेच त्यांच्या यशाचं खऱ्या अर्थाने रहस्य आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज मिशन’ या पुस्तकाबद्दल आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या ग्रंथाचं वर्णन “मोदी यांच्या संघर्ष आणि सत्याचं आरसासारखं चित्रण” असं करत, पुस्तकाचं मनापासून कौतुक केलं. शिंदे म्हणाले, “या पुस्तकात मोदीजींचं आयुष्य जसं आहे तसं प्रामाणिकपणे मांडलं गेलं आहे. यामधून त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, कष्ट आणि देशसेवेची तळमळ स्पष्ट दिसते.”
शिंदे यांनी पुढे सांगितलं की, गेल्या अकरा वर्षांत भारतात झालेला बदल अभूतपूर्व आहे. “मोदीजी मेहनतीचं दुसरं नाव आहेत. ते साधू, सैनिक किंवा प्रचारक होऊ शकले असते पण नियतीने त्यांना प्रचारक बनवलं, आणि त्यांच्या माध्यमातून भारताने आपली ताकद शोधली,” असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आपल्या भाषणात म्हटलं, “जीवन हे जन्म आणि मृत्यूदरम्यानचा प्रवास आहे, परंतु जो प्रवास लोकांसाठी समर्पित असतो, तोच खरा सार्थक असतो. मोदींनी आयुष्यभर देशसेवेचं ध्येय ठेवत नवे मार्ग दाखवले. ते केवळ नेते नाहीत, तर एक असे महापुरुष आहेत, ज्यांनी आपल्या कृतींनी समाजाला दिशा दिली.”
राजभवनात पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी ‘मोदीज मिशन’ या पुस्तकाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्याचा सखोल आणि प्रेरणादायी प्रवास उलगडल्याचं म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मोदींच्या कार्यशैलीचं, त्यांच्या जिद्दीचं आणि राष्ट्रसेवेतील समर्पणाचं तोंडभरून कौतुक केलं. या पुस्तकाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचं आयुष्य नव्या पिढीसाठी प्रेरणेचं स्रोत ठरणार असून, भारताच्या विकासगाथेतील एक ऐतिहासिक अध्याय म्हणून या प्रकाशन सोहळ्याची नोंद झाली आहे.