ताज्या बातम्या

Kolhapur : हजारो भाविकांनी 'याची देही याची डोळा' अनुभवला श्री करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव सोहळा

शाही लवाजमा आणि त्यात विराजमान श्री करवीर निवासिनी अंबाबाईचीच्या रथावर होणारा फुलांचा वर्षाव, नयनरम्य दृष्य.

Published by : Rashmi Mane

'अंबामाता की जय..'चा गजर, रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या, भालदार, चोपदार, विद्युत रोषणाई, फुलांनी सजलेला रथ, असा शाही लवाजमा आणि त्यात विराजमान श्री करवीर निवासिनी अंबाबाईचीच्या रथावर होणारा फुलांचा वर्षाव. अशा मंगलमय वातावरणात रविवार, 13 एप्रिल रोजी रात्री अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा पार पडला. जोतिबा चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी हा सोहळा पार पाडतो. वर्षातून एकदा श्री अंबाबाई देवी नगरवासियांची भेट घेण्यास बाहेर पडत असते. तर या शाही सोहळ्याला 'याची देही याची डोळा' प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.

कोल्हापूरमध्ये नेहमीच विविध धार्मिक उत्सव होत असतात. मात्र या विविध उत्सवांत श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या रथोत्सवाचे विशेष महत्त्व आहे. कोल्हापुरातील या रथोत्सवाला फार जुनी परंपरा असून दख्खनचा राजा जोतिबाची मुख्य चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा पार पडत असतो. त्यानुसार यंदाही ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्री अंबाबाई मंदिरात रात्री साडेनऊ वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर 'अंबा माता की जय'च्या जयघोषात रथोत्सवाला सुरुवात झाली. सुंदर अशा पद्धतीने सजवलेले देवीचे रथ आणि रथापुढे मानाचा घोडा होता तर रथावर देवीचा चोपदार, हवालदार, मशाल आणि सुरक्षा रक्षक होते.

परंपरागत वाद्यांच्या गजरात अंबाबाई मंदिरापासून रथोत्सवाला प्रारंभ झाला. प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणची पुष्पवृष्टी आणि नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात येत होती. तर आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथामध्ये श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी दिसत होती. बँड पथके, ढोलताशा पथके, चौऱ्या आणि मोर्चेल धरणारे सेवक, अशा लवाजम्यासह हा रथ नगरप्रदक्षिणेसाठी महाद्वार चौक, महाद्वार रोडमार्गे, गुजरी कॉर्नर येथे आला. यावेळी न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे गुजरी कॉर्नर येथे आतिषबाजी करण्यात आली. येथून रथ पुढे मार्गस्थ झाला आणि भवानी मंडपमार्गे तुळजाभवानी मंदिरासमोर आल्यानंतर देवीची आरती करण्यात आली.

दरम्यान, रथोत्सवात ठिकठिकाणी पुष्पवृष्टीसह प्रसादवाटप, सरबतवाटपही सुरू होते. तर हा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण हजारो कोल्हापूरकर एकवटले होते. तर अनेकांनी आपल्या कॅमेरामध्ये हा सोहळा टिपण्याचा प्रयत्न केला. यावेळी रथोत्सव मार्गावरती आकर्षक रांगोळी काढण्याची परंपरा आजही जपली जाते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा