इस्त्रायल आणि इराणमधील संघर्ष अधिक तीव्र झाला असून दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले सुरू आहेत. इस्त्रायलने इराणच्या राजधानी तेहरानवर लक्ष्य करत मोठे हल्ले केले. तर इराणनेही प्रत्युत्तरादाखल इस्त्रायलवर जोरदार हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इस्त्रायलने इराणच्या महत्त्वाच्या तेल डेपोवर हल्ला केला असून, इराणच्या एका प्रमुख लष्करी कमांडरचा खात्माही करण्यात आला आहे. त्यामुळे या संघर्षात आणखी वाढ झाली आहे.
दरम्यान, या संपूर्ण संघर्षासाठी अमेरिका इराणलाच जबाबदार धरत आहे. याचपार्श्वभूमिवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ’ या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्याबाबत गंभीर विधान केलं आहे. “आम्हाला माहिती आहे की खामेनी कुठे लपले आहेत. त्यांनी तात्काळ बिनशर्त आत्मसमर्पण करावं,” असं ट्रम्प यांनी म्हटलं, जरी त्यांनी थेट नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख खामेनींकडेच होता.
ट्रम्प यांनी पुढे म्हटलं, “आता इराणच्या आकाशावर आमचं संपूर्ण नियंत्रण आहे. इराणकडे काही संरक्षण यंत्रणा आहेत, पण त्या आमच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत.” जी-७ परिषदेतून अचानक वॉशिंग्टनला परतल्यामुळे चर्चेला उधाण आलं. यावर स्पष्टीकरण देताना ट्रम्प म्हणाले की, "ही फक्त तात्पुरती शस्त्रसंधी नकोय, आम्हाला संघर्षाचा पूर्णविराम हवा आहे – एक कायमचा शेवट.”