ताज्या बातम्या

ShivSena : एकनाथ शिंदेंच्या 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खर्च समोर, जाणून घ्या...

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महापालिकेतील सत्तास्थापनेचे गणित अधिकच रंगतदार झाले आहे.

Published by : Varsha Bhasmare

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महापालिकेतील सत्तास्थापनेचे गणित अधिकच रंगतदार झाले आहे. या निवडणुकीत शिवसेनेला 29 नगरसेवक निवडून आणण्यात यश आले असून, या आकड्यांमुळे महायुतीचा महापौर शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ न दवडता सावधगिरीची भूमिका घेत आपले सर्व नवनिर्वाचित नगरसेवक वांद्रे येथील ताज लँड एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले.

गेल्या तीन दिवसांपासून हे सर्व नगरसेवक ताज लँड एन्डमध्ये मुक्काम करून आहेत. काल स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नगरसेवकांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेत पुढील काळात कशाप्रकारे काम करायचे, पक्षाची भूमिका काय असेल, तसेच शिस्त आणि एकसंघपणा राखण्याबाबत महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. निवडून आलेल्या 29 नगरसेवकांपैकी 20 नगरसेवक हे प्रथमच निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख व्हावी, महापालिकेचे कामकाज समजावे, तसेच अनुभवी नगरसेवकांचे अनुभव नवख्या नगरसेवकांपर्यंत पोहोचावेत, यासाठी त्यांना एकत्र ठेवण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र, राजकीय वर्तुळात यामागे वेगळेच अर्थ काढले जात आहेत. मुंबई महापालिकेत अडीच-अडीच वर्षांचा महापौर पदाचा फॉर्म्युला लागू व्हावा आणि त्यातील अडीच वर्ष शिवसेनेला मिळावीत, तसेच स्टँडिंग कमिटी आणि इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये योग्य वाटा मिळावा, यासाठी हे एक प्रकारचे दबाव तंत्र असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच सर्व नगरसेवकांना ‘सुरक्षित’ ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. ताज लँड एन्ड हे हॉटेल मुंबईतील सर्वात महागड्या पंचतारांकित हॉटेलपैकी एक मानले जाते. येथे राहणे किंवा जेवण करणे हे सर्वसामान्य मुंबईकरांच्या आवाक्याबाहेरचे आहे. या हॉटेलमध्ये 18 प्रकारच्या खोल्या असून 24 तासांचे भाडे 18–20 हजारांपासून थेट एक लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. नगरसेवकांना ज्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले आहे, त्यांची किंमत 24 तासांसाठी सुमारे 28 ते 33 हजार रुपये असल्याची माहिती आहे. या दरात नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण समाविष्ट आहे.

शिवसेनेचे 29 नगरसेवक, त्यांच्यासोबत प्रत्येकी एक व्यक्ती, तसेच पक्षाचे 12 ते 15 महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी असे मिळून जवळपास 70 जण या हॉटेलमध्ये थांबले आहेत. यासाठी अंदाजे 35 खोल्या बुक करण्यात आल्या असून एका दिवसाचा खर्च 10 ते 12 लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. तीन दिवसांचा खर्च धरला तर तो 30 ते 36 लाख रुपयांपर्यंत पोहोचतो. याशिवाय कॉन्फरन्स हॉलचा खर्च वेगळा आहे. पुढील काही दिवस हा मुक्काम सुरू राहिल्यास खर्चात आणखी वाढ होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘हा खर्च कोण करतंय?’ असा सवाल आता सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनात उपस्थित होत आहे. महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ‘हॉटेल पॉलिटिक्स’ चर्चेत आली असून, शिंदेंच्या या हालचालींमुळे मुंबईच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा