भारतीय रेल्वेच्या इतिहासात शनिवारी एक नवा अध्याय सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील मालदा टाउन रेल्वे स्थानकावरून देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या शुभारंभासह वंदे भारत प्रकल्पाचा विस्तार स्लीपर सेवेपर्यंत होत असून, दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना आधुनिक आणि वेगवान पर्याय उपलब्ध होणार आहे.
सध्या दोन वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक ट्रेन कोलकाता (हावडा) ते गुवाहाटी (कामाख्या) दरम्यान धावणार असून, दुसरी गुवाहाटी ते कोलकाता मार्गावर सेवा देणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी या दौऱ्यात पश्चिम बंगालला एक डझनहून अधिक नवीन ट्रेन राष्ट्राला अर्पण करणार आहेत. याशिवाय सात ‘अमृत भारत’ ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवण्यात येणार असून, त्यामुळे पश्चिम बंगालचे इतर राज्यांशी असलेले रेल्वे संपर्क अधिक बळकट होणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी मालदामध्ये 3,250 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन देखील करणार आहेत. पश्चिम बंगाल आणि आसामसह पाच राज्यांत यावर्षी विधानसभा निवडणुका होत असल्याने या घडामोडीकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. वंदे भारत ट्रेनचा प्रवास 15 फेब्रुवारी 2019 रोजी पहिल्या चेअर कार सेवेसह सुरू झाला. त्यानंतर 30 सप्टेंबर 2022 रोजी वंदे भारत 2.0, तर 2025 मध्ये वंदे भारत 3.0 लाँच करण्यात आली. आता 17 जानेवारी 2026 रोजी पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होत आहे. पुढील टप्प्यात 2027 मध्ये कवच सुरक्षा प्रणालीच्या प्रगत 5.0 आवृत्तीसह वंदे भारत 4.0 सेवा सुरू होणार आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 पर्यंत वंदे भारत ट्रेनची संख्या 164 झाली असून, 2030 पर्यंत ती 800 वर पोहोचेल. तर 2047 पर्यंत देशात तब्बल 4,500 वंदे भारत ट्रेन धावण्याचे लक्ष्य आहे. या ताफ्यात चेअर कार आणि स्लीपर दोन्ही प्रकारच्या ट्रेनचा समावेश असेल. सध्या वंदे भारत स्लीपर ट्रेन 1,000 ते 1,500 किलोमीटर अंतरासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. मात्र भविष्यात काश्मीर ते कन्याकुमारीसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांवरही या सेवा सुरू केल्या जातील. वेगवान ट्रेनसोबतच समर्पित हाय-स्पीड कॉरिडॉर आणि अत्याधुनिक ट्रॅक उभारणीवरही रेल्वे काम करत असून, या गाड्या बुलेट ट्रेनप्रमाणे ताशी 350 किलोमीटर वेगाने धावू शकतील, असा दावा रेल्वेने केला आहे.