राज्यातील २९ महापालिकांसाठी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण आज अर्जांची छाननी (स्क्रुटनी) होणार आहे. या प्रक्रियेत पात्रता, कागदपत्रांची पूर्तता, नियमांचे पालन यांची तपासणी केली जाणार असून, याच छाननीत कोणाचे अर्ज वैध ठरतात आणि कोणाचे बाद होतात, याकडे सर्वच राजकीय पक्षांसह उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २ जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे छाननीनंतर काही उमेदवार स्वेच्छेने माघार घेण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक प्रभागांमध्ये लढतींची समीकरणे बदलू शकतात. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत तर काही ठिकाणी थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे.
३ जानेवारी रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार असून, याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. चिन्ह वाटपानंतर निवडणुकीचा प्रचार अधिक तीव्र होईल, अशी चिन्हे आहेत. राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी रणनिती आखली जात असून, प्रभागनिहाय बैठका, प्रचार सभा, पदयात्रा आणि संपर्क मोहिमा वेग घेणार आहेत.
दरम्यान, १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, राज्यातील २९ महापालिकांमध्ये एकाच दिवशी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानानंतर अवघ्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असल्याने निकालाबाबतची उत्कंठा अधिक वाढली आहे. या निवडणुकांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील सत्तासमीकरणे बदलण्याची शक्यता असून, आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही या महापालिका निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
आजच्या अर्ज छाननीदरम्यान कोणाचे अर्ज बाद होतात आणि कोण निवडणूक रिंगणात टिकतात, यावर अनेक प्रभागांतील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत निर्णायक ठरणार आहे.