घाटरकोपर येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य केल आहे. 'मुंबई ही कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा असून वेगवेगळ्या परिसरामध्ये विविध भाषा बोलल्या जातात. जसे की, मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे' असं वक्तव्य त्यांनी केल आहे. ज्यावर आता विधानसभेत पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी विधानसभेत आवाज उठवला आहे, त्याचसोबत भैय्याजी जोशी यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. याचपार्श्वभूमिवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भैय्याजी जोशी यांच वक्तव्य मी ऐकलेल नाही. त्यामुळे त्यांच वक्तव्य पुर्णपणे ऐकून मी त्याच्यावर बोलेन. पण सरकारची भूमिका यावर अशी आहे की, यावर सरकारची भूमिका पक्की आहे मुंबईची, महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची भाषा मराठी आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकल पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. खरं म्हणजे माझ्या वक्तव्यात आणि या संदर्भात भैय्याजींच देखील काय दुमत असेल असं मला काही वाटत नाही".
"पण तरी मी शासनाच्या वतीने पुन्हा एकदा सांगतो की, मुंबईची आणि महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे कोणत्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही, कारण जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करु शकतो तोच दुसऱ्यांच्या भाषेवर देखील प्रेम करु शकतो. त्यामुळे शासनाची भूमिका मराठी आहे", असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भैय्याजी जोशींनी केलेल्या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.