मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. त्यानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 1 ते 20 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच बारावीतील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तसेच दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरु होईल. पुणे बोर्डाने त्यासंबंधीचे नियोजन अंतिम केले असून वेळापत्रक सर्वच शाळा, महाविद्यालयांना पाठविले आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना अभ्यासाची व परीक्षांची तयारी सुरु करावी लागणार आहे.
इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन पूर्ण करण्यासाठी 20 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विषयाचे देखील प्रात्यक्षिक त्याचवेळी पार पडेल. तसेच प्रात्यक्षिक परीक्षा संपल्यानंतर लेखी परीक्षा सुरु होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक परीक्षा 10 फेब्रुवारी ते 1 मार्च या काळात उरकावी लागणार आहे. त्यानंतर लगेचच त्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सुरु होईल. विद्यार्थ्यांनीही परीक्षांची तयारी सुरु केली आहे. जानेवारीत दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांची शाळा-महाविद्यालय स्तरावर सराव परीक्षा घेतली जाईल. त्याचे नियोजन मुख्याध्यापक संघाकडून सुरु आहे.
प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक
बारावी : 1 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी
अंदाजित परीक्षा केंद्रे : 3000
अंदाजित परीक्षार्थी : 15 लाख
दहावी : 10 फेब्रुवारी ते 1 मार्च
परीक्षा केंद्रे : 5000
एकूण अंदाजित परीक्षार्थी : 16 लाख