राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेली माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक आता अधिकच रंगतदार झाली आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार थेट रिंगणात उतरले असून त्यांनी मोठा दावा करत म्हटले आहे की, "या कारखान्याचा चेअरमन मीच होणार आहे." यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांना सर्वाधिक ऊस दर देण्याचे आश्वासन देत त्यांच्या निळकंठेश्वर पॅनलसाठी प्रचार सुरू केला आहे.
अजित पवार म्हणाले की, "महाराष्ट्रातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये माळेगाव साखर कारखान्याचे नाव मी आणून दाखवेल आणि कामगारांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे तुम्ही आम्हालाच निवडून द्या," असे आवाहन त्यांनी सभासदांना केले.
या निवडणुकीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट, शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट आणि तावरे गटाचे पॅनल यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. राज्याच्या राजकीय पटलावर या निवडणुकीकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे सुद्धा प्रचारात उतरल्या आहेत. 'बळीराजा बचाओ' हे शरद पवार गटाचे पॅनल आहे. त्यांनी अधिकृत प्रचाराचा नारळ फोडत कारखान्याच्या सध्याच्या अडचणींचा उल्लेख केला. "हा कारखाना सध्या खूप अडचणीत आहे. तुम्हाला हा कारखाना वाचवायचं असेल, तर आमचं पॅनल निवडून द्या. आम्ही कामगारांचे, शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवू," अशी ग्वाही त्यांनी दिली.
एकीकडे राज्याच्या विविध भागांत गेल्या काही महिन्यांमध्ये अजित पवार आणि शरद पवार हे एकाच मंचावर एकत्र येताना दिसले. एकाच व्यासपीठावरून भाष्य करताना त्यांच्यातील सौहार्दाचे संकेत मिळत होते. मात्र, बारामतीमधील या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘काका-पुतण्यां’मध्ये पुन्हा एकदा थेट आमनेसामने लढत होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ साखर कारखान्यापुरती मर्यादित राहणार नाही, तर ती राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील अंतर्गत संघर्षाचे प्रतीक ठरण्याची शक्यता आहे. आता या कारखान्यावर कुणाचा झेंडा फडकेल, याकडे बारामतीसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा