‘आरे’ कारशेडच्या मुद्द्यावरून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मेट्रो प्रकल्पाला आपण कधीच विरोध केला नव्हता, तर पर्यावरणाचा समतोल राखत विकास व्हावा, हीच भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “मला मेट्रो नको होती असं नाही. मी स्वतः मेट्रो लाईन २ चं लोकार्पण केलं होतं. आमच्या सरकारचा स्पष्ट दृष्टिकोन होता की मेट्रोचा विकास व्हावा, मात्र त्यासाठी आरेचं जंगल कापण्याची गरज नाही. कारशेडसाठी कांजूरमार्ग ही योग्य आणि व्यवहार्य जागा होती.” मात्र, त्या काळात या निर्णयावरून आपल्यावर सातत्याने टीका करण्यात आली, असंही त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, “आरेचं जंगल वाचवण्यासाठी आम्ही ठाम भूमिका घेतली होती. पर्यावरणाचा ऱ्हास न करता विकास कसा करता येईल, हे दाखवून दिलं होतं. पण आजच्या सरकारनं हट्टापायी आरेचं जंगल तोडलंच आणि आता कांजूरमार्गची जागाही वापरात आणली आहे. मग हा हट्ट नेमका कशासाठी?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
सध्याच्या सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी दिला जात असून, यामुळे मुंबईच्या पर्यावरणावर दीर्घकालीन परिणाम होणार आहेत. आरे परिसर हा केवळ हिरवळ नाही, तर मुंबईसाठी ‘ग्रीन लंग’सारखा महत्त्वाचा भाग असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
दरम्यान, आरे कारशेडचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, पर्यावरण विरुद्ध विकास हा वाद नव्याने पेटण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.