मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, यापार्श्वभूमीवर आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समाजातील आंदोलकांना शिस्तीचं आणि संयमाचं आवाहन केलं आहे. “आपल्या व्यासपीठावर कोणीही आला, अगदी दुश्मनसुद्धा आला तरी त्याचा सन्मान करा. गोंधळ घालणार असाल तर कोणीही नेते येणार नाहीत. सहन होतंय तोवर सन्मान करा, आरक्षण मिळणार नाही हे स्पष्ट झालं तर मग पुढे काय करायचं ते ठरवू,” असा इशाराच जरांगेंनी दिला.
आंदोलनादरम्यान बोलताना जरांगे म्हणाले, “तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. कोणी गोंधळ घातला तर त्याची जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल. सरकारला दंगल घडवायची आहे, म्हणून सावध राहा. समुद्रात जाण्याचा प्रयत्न करू नका, जीव धोक्यात घालू नका. एक एक माणूस महत्वाचा आहे. रस्त्यात गाड्या लावू नका, गाड्या मैदानात लावा,” असं आवाहन त्यांनी आंदोलकांना केलं.
दरम्यान, आरक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांबाबतही जरांगेंनी भूमिका स्पष्ट केली. “आम्ही सरकारला कोणतीही नवी कागदपत्रं देणार नाही. १३ महिन्यांपूर्वीच सरकारने कागदपत्रं घेतली आहेत. सातारा संस्थान आणि हैदराबाद संस्थानच्या गॅझेटियरमध्ये मराठवाड्यातील मराठे कुणबी असल्याचं स्पष्ट नमूद आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारला यात अडथळा येणं शक्य नाही. ५८ लाख नोंदी उपलब्ध आहेत. ज्या लोकांच्या नोंदी मिळाल्या नाहीत, त्यांना पोटजात घेऊन अध्यादेश काढावा,” अशी मागणी त्यांनी केली.
“कुणबी ही उपजात आहे हेच कायद्यात म्हटलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करायचं असेल तर ‘मराठा कुणबी’ पोटजात म्हणून घ्या, पण सरसकट म्हणायची गरज नाही,” असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं.
मुंबईतील या आंदोलनात लाखो मराठा समाजबांधव सहभागी झाले असून, आझाद मैदानावर दररोज मोठी गर्दी उसळत आहे. विविध राजकीय नेते या आंदोलनाला भेटी देत आहेत. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. मात्र, त्या निघून गेल्यानंतर आंदोलकांनी त्यांना घेराव घालत घोषणाबाजी केली. यावेळी शरद पवार यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून, सरकारवर तोडगा काढण्यासाठी दबाव वाढत आहे.