गेल्या आठवडाभर महाराष्ट्रमध्ये चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे मुंबईसह इतर उपनगरांमध्ये भाजीपाल्यांचे दर वाढलेले असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे.
महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अवकाळी पाऊस आणि वेळेआधीच येऊन धडकलेला मान्सून यावेळी भाजीपाल्याचे क्षेत्र खूप कमी झाले आहे. त्यामुळे भाज्यांचे उत्पादन घटले. भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक घटली. त्याउलट मागणी वाढल्यामुळे भाज्यांचे दर मात्र मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पावसाच्या पाण्याने तसेच वाहतूकीमध्ये भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात पालेभाज्यांच्या दरात 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. तर घाऊक बाजारात पालेभाज्या खराब होऊ लागल्यामुळे त्या फेकण्यात येत आहेत. नवी मुंबईच्या बाजारात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुणे, जुन्नर, नगर, सातारा, बारामती अश्या विविध जिल्ह्यामधून भाज्या विक्रीसाठी येत असतात.
याच बाजारपेठेतून भाज्या मुंबई आणि इतर उपनगरांमध्ये विक्रीसाठी पाठवल्या जातात. मागील काही दिवसांपासून पावसामुळे तसेच दमट वातावरणामुळे भाज्या त्यातही विशेषतः पालेभाज्या दोन दिवस ही टिकत नाहीत. त्यामुळे त्या भाज्या सडतात आणि मग त्या फेकून द्याव्या लागतात. फळभाज्यांच्या मानाने पालेभाज्यांचे दर यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. मुंबई आणि उपनगरीय भागामध्ये पूर्वी मेथी , शेपू या भाज्या 15 रुपये जुडी होत्या मात्र आता त्यांची किंमत 40 रुपये जुडी इतकी झाली आहे. तर पालकची जुडी 30 रुपये इतकी झाली आहे. 10 रुपयांला मिळणारी कोथिंबिरीची किंमत 50 रुपये इतकी आहे. पालेभाज्या इतक्या महाग झाल्यामुळे जेवणाच्या ताटातून हिरव्या भाज्या गायब होत आहेत, तर दुसरीकडे कोबी, ढोबळी मिरची,फ्लॉवर , बटाटा ,भेंडी या फळभाज्यांचे ही दर 10 ते 20 रुपयांनी महागले आहेत. आणि कांद्याचे दर ऐकून तर सामान्यांच्या डोळ्यातून पाणीच येत आहे