मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील उपोषण सलग पाचव्या दिवशीही सुरू आहे. लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांनी दक्षिण मुंबईत तळ ठोकला असून संपूर्ण परिसरात आंदोलनाचे वातावरण कायम आहे.
आज पुन्हा या आंदोलनावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. दुपारी 3 वाजता ही सुनावणी होणार असून कालच्या सुनावणीत कोर्टाने सरकारला दुपारी 4 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आज कोर्ट कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, आंदोलकांना राज्य सरकार आणि पोलिसांनी आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. मात्र, कोर्टाने दक्षिण मुंबईत आंदोलनास मंजुरी नाकारत आंदोलकांनी त्वरित जागा रिकामी करावी असा आदेश दिला होता.
कोर्टाने स्पष्ट केले आहे की, या आंदोलनादरम्यान जर कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्याची जबाबदारी राज्य सरकार आणि पोलिस विभागाची असेल. त्यामुळे प्रशासनावर मोठे दडपण आले असून आजची सुनावणी आंदोलनाच्या पुढील दिशेला निर्णायक ठरणार आहे.