महाराष्ट्रासह तब्बल १६ राज्यांत पुढील काही दिवस धुव्वाधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. देशात सध्या मान्सून सक्रिय असून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पुढील दोन दिवसांत हे कमी दाबाचे क्षेत्र अधिक मजबूत होणार असल्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात आजपासून मुसळधार पाऊस पडणार आहे. जम्मू आणि काश्मीर तसेच पश्चिम पंजाबमध्येही पावसाचा जोर कायम राहील. उत्तर भारतात पुढील सात दिवस उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः २८ आणि २९ ऑगस्ट रोजी उत्तराखंडमध्ये तर २९ ऑगस्टपासून १ सप्टेंबरपर्यंत पूर्व राजस्थानात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार असून २७ आणि २८ ऑगस्ट रोजी राज्यात धुव्वाधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. घाटमाथ्यावरील भागात मुसळधार पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा आणि विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
पूर्व भारतातील ओडिशा, झारखंड, बिहार आणि मध्य प्रदेशातही पावसाचा जोर राहणार आहे. ओडिशामध्ये आज म्हणजे २६ ऑगस्ट रोजी आणि छत्तीसगडमध्ये २६ ते २८ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातही पुढील पाच ते सात दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
दक्षिण भारतातही मान्सून सक्रिय राहणार आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. ईशान्येकडील राज्यांमध्येही ३१ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रासोबतच पश्चिमी विक्षोभ आणि चक्रीवादळीय वाऱ्यांचा प्रभाव यामुळे देशभरातील विविध राज्यांमध्ये हवामानात मोठा बदल होत आहे. मान्सून ट्रफ सध्या त्याच्या सामान्य स्थितीजवळ असून याचा परिणाम म्हणून देशाच्या बहुतेक भागांत पाऊस वाढला आहे. एकूणच, देशातील १६ राज्यांमध्ये पुढील दोन ते पाच दिवसांपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.