जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर मिशन राबवले. या मिशन अंतर्गत भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली. शिवाय पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यालाही भारताने चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, भारतातील परराष्ट्र सचिव आणि संरक्षण विभागाने वेळोवेळी भारत-पाकिस्तान संघर्षाची माहिती देशासमोर मांडली. तसेच भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली असून भारताने दहशतवाद्यांविरोधात ठाम भूमिका मांडली आहे.
आता दहशवादाविरोधी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचे पाउल उचलले आहे. यामध्ये केंद्र सरकारतर्फे सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे तयार करण्यात आली असून ही शिष्टमंडळे लवकरच जगातील प्रमुख मित्रराष्ट्रांना भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान, शिष्टमंडळे दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध भारताचा राष्ट्रीय संकल्प आणि कठोर भूमिका जगासमोर मांडतील. या शिष्टमंडळातील सदस्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी घोषणा केली आहे. सरकार ऑपरेशन सिंदूरचं सत्य जगासमोर मांडणार असल्याचं शिंदे म्हणाले.