भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड दौऱ्यात ऐतिहासिक यश मिळवले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने प्रथमच इंग्लंडमध्ये ट्वेन्टी-20 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारताने 3-2 अशी आघाडी घेत विजय संपादन केला. त्यानंतर एकदिवसीय मालिकेतही भारतीय महिला संघाने 2-1 अशी सरशी मिळवत इंग्लंडमध्ये वर्चस्व सिद्ध केलं.
या विजयात अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात सलामीवीर स्मृती मनधनाने शानदार शतक झळकावत संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने शतक ठोकत संघाचा डाव सावरला. विशेष लक्ष वेधून घेतलं ते 21 वर्षीय वेगवान गोलंदाज क्रांती गौडने. तिने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सहा बळी घेत ऐतिहासिक कामगिरी केली. ही पराक्रम करणारी ती सर्वांत कमी वयाची भारतीय वेगवान गोलंदाज ठरली.
या मालिकांमुळे भारतीय संघाचा आगामी विश्वचषक स्पर्धांसाठी आत्मविश्वास उंचावला आहे. 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय महिला विश्वचषक स्पर्धेला भारत व श्रीलंका संयुक्त यजमान आहेत, तर पुढील वर्षी इंग्लंडमध्ये ट्वेन्टी-20 विश्वचषक होणार आहे.
या ऐतिहासिक कामगिरीवर प्रतिक्रिया देताना सचिन तेंडुलकर म्हणाले “इंग्लंडमध्ये जिंकणे नेहमीच कठीण असते. अशा परिस्थितीत भारतीय संघाने दाखवलेली तयारी आणि आत्मविश्वास कौतुकास्पद आहे. ही कामगिरी आगामी स्पर्धांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.”
हेही वाचा