कर्नाटक सरकारने कामकाजी महिलांसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. राज्य मंत्रिमंडळाने मासिक पाळीदरम्यान महिलांना दर महिन्याला एक दिवस वेतनासह सुट्टी देण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश सरकारने 12 नोव्हेंबर रोजी जारी केला.
या निर्णयानुसार 18 ते 52 वर्ष वयोगटातील सर्व महिला कर्मचारी, कायमस्वरूपी असोत किंवा करारावर काम करणाऱ्या, यांना वर्षभरात 12 दिवस पगारी सुट्टी मिळेल. म्हणजे प्रत्येक महिन्याला एक दिवस विश्रांती घेता येईल. या काळात वेतनात कोणतीही कपात करता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने फॅक्टरी ॲक्ट 1948, कर्नाटक शॉप्स अँड कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 1961, तसेच इतर कामगार कायद्यांच्या अधीन असलेल्या सर्व आस्थापनांना या नियमाचं पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे, ही सुविधा आयटी आणि खासगी क्षेत्रातील महिलांनाही लागू असेल. हा प्रस्ताव डॉ. सपना एस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला होता. सुरुवातीला सहा दिवस सुट्टीचा प्रस्ताव होता, परंतु श्रम विभागाने ती संख्या वाढवून 12 दिवस केली. सरकारी आदेशानुसार, ही सुट्टी त्या महिन्यातच वापरावी लागेल, ती पुढे जमा करता येणार नाही. तसेच, सुट्टीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नाही — महिला फक्त तोंडी एचआर विभागाला कळवून सुट्टी घेऊ शकतील.
या निर्णयामुळे कामकाजी महिलांना मासिक पाळीदरम्यान आराम आणि आरोग्य सांभाळण्यासाठी अधिक सहकार्य मिळणार आहे, अशी व्यापक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.