राज्यातील चर्चेत असलेल्या 'लाडकी बहीण' योजनेवर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट टिप्पणी करत म्हटलं आहे की, या योजनेमुळे अन्य योजनांच्या निधी वितरणात विलंब होत आहे. इंदापूर येथे झालेल्या अपूर्ण घरकूल लाभार्थी मेळावा आणि पहिल्या हप्त्याच्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्याचे क्रीडामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दत्तात्रय भरणे म्हणाले की, "मी इंदापूर तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत 'लाडकी बहीण' योजनेमुळे काहीसा निधी मिळण्यात उशीर होत आहे. तरीही, परिस्थिती सुधारतेय आणि सर्वकाही पूर्वपदावर येत आहे."
या विधानामुळे महायुती सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, विरोधकांनीही सरकारवर टीका करण्याची संधी साधली आहे. कारण यापूर्वीही अनेकदा या योजनेसाठी इतर विभागांमधील निधी वळवण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याच मुद्द्यावर सामाजिक न्याय विभागाचाही निधी वळवण्यात आल्याचा आरोप झाला होता.
अजित पवारांची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, "तो माझा सहकारी आहे. मी त्याच्याशी बोलून नेमकं काय म्हणायचं होतं ते विचारतो आणि मग सविस्तर सांगतो." त्यामुळे भरणे यांच्या विधानाचा सरकारमध्येच नेमका अर्थ काय घेतला जातो, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा