लालबागचा राजाच्या विसर्जन सोहळ्याला यंदा तांत्रिक अडचणींमुळे विलंब होत आहे. नव्या मोटराइज्ड तराफ्यावर मूर्ती चढवताना समुद्रातील भरतीमुळे मोठा अडथळा आला. त्यामुळे अपेक्षित वेळेत विसर्जन शक्य झाले नाही. राजाची विसर्जनाची मिरवणूक तबला 24 तास होऊन 8 तासांपासून अधिक वेळ लालबागच्या राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवर आहे. मंडळाने सुरुवातीला अत्याधुनिक तराफ्यावर विसर्जन करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, पाण्याची पातळी जास्त असल्याने तांत्रिक अडचणी आल्या आणि अखेर विसर्जन थांबवण्यात आले. कोळी बांधवांच्या मदतीने मूर्ती सुरक्षितपणे विसर्जित करण्यासाठी तयारी सुरू आहे. यादरम्यान नुकतीच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता थोड्यावेळात भरतीचे पाणी कमी झाल्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन अंतिम टप्प्यात आलं आहे.
लालबागच्या राजाची पुन्हा एकदा विसर्जनाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. समुद्रला आलेल्या भरतीचे पाणी आता ओसरू लागले असल्यामुळे समुद्र किनाऱ्यावरच अडकलेली लालबागच्या राजाची मूर्ती आता पुन्हा एकदा तराफ्यावर आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे थोड्याच वेळात राजाचं विसर्जन होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच जर सध्याचं विसर्जन शक्य झालं नाही, तर रात्री नऊ वाजताच्या सुमारास समुद्राला पुन्हा भरती येणार आहे. त्यावेळी लालबागच्या राजाचं विसर्जन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याचपार्श्वभूमिवर सुधीर साळवी म्हणाले की, "लालबागचा राजा हा गिरगावला पोहोचण्यापूर्वी समुद्राला भरती आली होती. भरती येण्यापूर्वी लालबागचा राजा हा तरफ्यावर येणे अपेक्षित असतं. लालबागचा राजा हा कोट्यावधी लोकांचा भावना आहेत. ज्याप्रकारे इयत्ता आला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही दहा ते पंधरा मिनिटे उशिरा पोहोचलो. मुंबई पोलिसांचा सुद्धा आभार मानतो. माध्यमांचा सुद्धा आभार मानतो. कार्यकर्त्यांसाठी हा वेगळा क्षण आहे. आम्ही नियोजन करतो आणि होत नाही असं कधी होत नाही. पण आम्ही आता दिलगिरी व्यक्त करतो".
"अतिशय योग्य पद्धतीने साचेबद्ध पद्धतीने आम्ही अनेक वर्षे काम करतोय. अतिशय नवीन पद्धतीने हा तरफ बनवला आहे. चांगल्या पद्धतीने हा विसर्जन सोहळा होईल. अनेक वर्ष कोळी बांधव या विसर्जन सोहळ्यात सहभागी होतात. आता हा तरफा पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल. तुफान पाऊस पडत असल्याने भरती लवकर आली. त्यामुळे मंडळाने निर्णय घेतला की विसर्जन थांबवलं पाहिजे. सर्व भाविकांचा श्रद्धास्थान असलेला बाप्पाचा अयोग्य होण्यापेक्षा काही उशीर झालेला चालेल. आता हे विसर्जन पार पडेल".