21 सप्टेंबर 2025 रोजी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण लागणार आहे. हे खंडग्रास स्वरूपाचं ग्रहण असून भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:59 वाजता सुरू होईल आणि पहाटे 3:23 वाजेपर्यंत चालेल. ग्रहणाचा मध्यकाळ रात्री 1:11 वाजता आहे. एकूण कालावधी सुमारे 4 तास 24 मिनिटांचा असणार आहे.
तथापि, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून सूतक काळ लागू होणार नाही. नेहमीप्रमाणे सूर्यग्रहणापूर्वी 12 तासांचा सूतक काळ पाळला जातो. पण हे ग्रहण भारतातून न दिसल्याने मंदिरांचे दरवाजे बंद करणे, विवाह किंवा इतर शुभकार्यांवर बंदी घालणे अशा प्रथांचा या वेळेस परिणाम होणार नाही.
हे ग्रहण प्रामुख्याने ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागात, प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर आणि अंटार्क्टिक प्रदेशात पाहता येईल. खगोलशास्त्रानुसार, सूर्यग्रहण तेव्हा होते जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येऊन सूर्याच्या काही भागावर सावली टाकतो. अमावस्येला अशा घटना घडतात, तर पौर्णिमेला चंद्रग्रहण होते.
दरम्यान, 2026 सालातील पहिलं सूर्यग्रहण 17 फेब्रुवारीला लागेल. ते वलयाकार ग्रहण असेल आणि त्या वेळी “Ring of Fire” नावाचा विलक्षण दृश्य अनुभवायला मिळेल. हा अद्भुत नजारा सुमारे 3 मिनिटे 20 सेकंद टिकणार आहे. यंदाच्या शेवटच्या सूर्यग्रहणाने खगोलप्रेमींमध्ये उत्सुकता वाढवली आहे, जरी भारतातून ते दिसणार नसले तरी जगातील इतर भागांत त्याची प्रतीक्षा आहे.