बावधन पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणात महत्त्वपूर्ण वळण आले आहे. या प्रकरणात पूर्वी तीन आरोपींना म्हणजेच वैष्णवी हगवणेच्या सासूला, नंदेला आणि तिच्या दिराला अटक करण्यात आलेली होती. उर्वरित दोन आरोपी फरार होते. या फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एकूण 10 विविध पथके कार्यरत ठेवली होती.
अखेर पोलीस पथकांच्या सातत्यपूर्ण तपासामुळे यश मिळाले असून, प्रकरणातील मुख्य दोन आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना स्वारगेट येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या अटकेची अधिकृत पुष्टी पत्रकार परिषदेत दिली आहे. आज दुपारी या दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
या गुन्ह्याशी संबंधित सर्व महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. गोळा करण्यात आलेले सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्यात येणार आहेत. या प्रकरणात दोषारोपपत्र सादर करून संपूर्ण गुन्ह्याला न्यायालयीनदृष्ट्या लॉजिकल एंड मिळवण्याचा निर्धार पोलीस विभागाने व्यक्त केला आहे.