(Champion Ajinkya Naik in the MCA election fray) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदाची निवडणूक अखेर कोणत्याही विरोधाशिवाय पूर्ण झाली असून अजिंक्य नाईक हे पुन्हा अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड, विहंग सरनाईक आणि अजिंक्य नाईक यांच्यात चुरस अपेक्षित होती. मात्र, सर्वांनी अचानक माघार घेतल्याने नाईक यांचा विजय निश्चित झाला.
या पार्श्वभूमीवर माजी अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य निर्णायक ठरलं. “क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ते पाळतात,” असं पवारांनी सांगितलं होतं. त्यांच्या या ‘गुगली’मुळेच निवडणुकीचा रंगच बदलल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात आहे.
अजिंक्य नाईक यांनी निवडीनंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचे आभार मानले. निवडणुकीच्या आदल्या दिवशी ‘वर्षा’ निवासस्थानी पवार आणि फडणवीस यांच्यात झालेल्या चर्चेनंतर प्रमुख उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 12 नोव्हेंबरची निवडणूक टळली आणि नाईक यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. राजकीय मतभेद विसरून पवार–फडणवीस यांनी पुन्हा एकदा ‘क्रिकेटसाठी’ हातमिळवणी केल्याने अजिंक्य नाईक हे एमसीएच्या मैदानात पुन्हा विजयी ठरले आहेत.