Mumbai High Court Dadar Balasaheb Thackeray Memorial Decision : दादर येथील दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अखेर न्यायालयीन मंजुरी मिळाली आहे. गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलासा दिला. स्मारकाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.
त्यामुळे स्मारकाच्या पूर्णत्वाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या याचिका भगवानजी रयानी, पंकज राजमाचीकर, जनमुक्ती मोर्चा आणि संतोष दौंडकर यांनी दाखल केल्या होत्या. यामध्ये महापौर बंगल्याची जागा स्मारकासाठी वापरणे, जमीन अत्यल्प दराने 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देणे, कायदेशीर प्रक्रिया न पाळणे, अशा विविध मुद्द्यांवर आक्षेप नोंदवण्यात आला होता.
मात्र, मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने सर्व युक्तिवाद ऐकून घेत निर्णय राखून ठेवला होता. 24 जून रोजी अंतिम सुनावणी पार पडली आणि आता याचिकांवर नकार देण्यात आला आहे. राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि स्मारक न्यासातर्फे कायदेशीर प्रक्रियेचे पालन केल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. जागा बदलासंदर्भात नोटीस देऊन नागरिकांच्या हरकती ऐकल्या गेल्या, तसेच अशा प्रकारच्या भूखंड वाटपाचा शासनाचा एक धोरणात्मक निर्णय असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या निर्णयामुळे स्मारकाच्या उद्घाटनाला गती मिळणार असून, महापौर बंगल्याचे जतन करून त्याचे नूतनीकरण वारसा वास्तू म्हणून करण्यात आले आहे.
हेही वाचा..