Cyclone Shakti : राज्याला आधीच अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला असताना, आता महाराष्ट्रावर आणखी एक नैसर्गिक संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. विशेषत: कोकण किनारपट्टी आणि मुंबई परिसरात याचा गंभीर परिणाम दिसू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्राने अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना केला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या पूरस्थितीत आल्या, तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. अनेक शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला आणि घरदारांचे मोठे नुकसान झाले. गेल्या काही दिवसांत पावसाने थोडा विराम घेतला होता, पण आता हवामान विभागाच्या नव्या इशाऱ्याने पुन्हा एकदा राज्यभर चिंता निर्माण झाली आहे.
IMD च्या ताज्या माहितीनुसार, अरबी समुद्रात निर्माण झालेले हे चक्रीवादळ सध्या पश्चिम किनाऱ्याकडे सरकत आहे आणि त्याची तीव्रता वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खोल समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो, असेही हवामान खात्याने सांगितले. चक्रीवादळाच्या परिणामामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सोलापूर, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता व्यक्त केली आहे.
मत्स्यव्यवसायावरही या वादळाचा मोठा परिणाम होणार आहे. हवामान खात्याने मच्छिमारांना पुढील दोन ते तीन दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा दिला असून, किनारपट्टीवरील बंदरांवर लाल झेंडे फडकवण्यात आले आहेत. समुद्रात वादळसदृश परिस्थिती असल्यामुळे मत्स्य विभागाने देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, राज्य प्रशासनाने किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन पथके तयार ठेवण्यात आली असून, संभाव्य धोक्याच्या भागांत एनडीआरएफ आणि स्थानिक यंत्रणा तैनात केल्या जाणार आहेत. राज्याला नुकसानीतून सावरायची संधी मिळत नाही तोच निसर्ग पुन्हा आपली ताकद दाखवत आहे. पुढील दोन दिवस हवामानातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.