पुणे शहरातील राजाबहादूर मिल्स येथील किकी नावाच्या पबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फ्रेशर्स पार्टीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनसे) धाड टाकली. या पार्टीत नामांकित कॉलेजमधील 17 ते 21 वयोगटातील विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. कार्यकर्त्यांच्या आरोपानुसार, पब चालकांनी कोणतेही ओळखपत्र न पाहता अल्पवयीन मुलांना प्रवेश दिला आणि त्यांना सर्रास मद्य विक्री केली. इतकेच नव्हे तर एन्ट्रीचे रजिस्टरसुद्धा ठेवले नव्हते.
मनविसेच्या कार्यकर्त्यांसोबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. गैरप्रकार उघड होताच पार्टी तातडीने बंद करण्यात आली. या कारवाईनंतर मनविसे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी पब चालकांना थेट इशारा दिला की, "यापुढे जर कुठल्याही पब किंवा रेस्टॉरंटने फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली अल्पवयीन मुलांना दारू पाजली, तर त्या पबची एकही काच शिल्लक ठेवली जाणार नाही. गरज पडल्यास संपूर्ण पब फोडण्यात येईल."
या घटनेनंतर पुण्यातील पब्समध्ये अल्पवयीन मुलांना होणाऱ्या मद्यविक्रीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कॉलेज तरुणाईला आकर्षित करण्यासाठी पबमधील नियमबाह्य पद्धतींचा वापर होत असल्याचा आरोप वारंवार होत असून, प्रशासनाने या संदर्भात कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.