मुंबईतील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महापालिकेकडून 'म्हाडा'च्या धर्तीवर परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घरांची विक्री दिवाळीनंतर लॉटरी पद्धतीने होणार असून, यामुळे अनेक मुंबईकरांचा फायदा होणार आहे. महापालिकेला विकासकांकडून एकूण 426 घरे मिळाली असून, ती नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहेत.
ही घरे 270 ते 528 चौरस फूट क्षेत्रफळाची असून, त्यांची किंमत अंदाजे 60 लाख ते 1 कोटी रुपयांच्या दरम्यान असणार आहे. महापालिकेला या विक्रीतून तब्बल 300 कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांना परवडणाऱ्या दरात स्वतःचं हक्काचं घर घेण्याची संधी मिळणार आहे.
अल्प आणि अत्यल्प उत्पन्न या दोन्ही गटातील नागरिकांना घर खरेदीसाठी अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रिया महापालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पार पडणार आहे. पुढील आठवड्यापासून या घरांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. मुंबईतून भांडुप पश्चिम, कांजुरमार्ग, अंधेरी पूर्व, कांदिवली पूर्व-पश्चिम, दहिसर, गोरेगाव, जोगेश्वरी आणि भायखळा अशा भागांचा यात समावेश आहे.