महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा अजून खाली बसलेला नसतानाच राज्यातील राजकारण पुन्हा तापू लागले आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी तब्बल ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी दिली. महापालिका निवडणुकांनंतर लगेचच होणाऱ्या या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण ताकद पणाला लावण्याचा निर्धार केल्याचे या यादीवरून स्पष्ट होत आहे.
जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत पक्षातील जवळपास सर्वच दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांसारख्या दिग्गज नेत्यांचा यात समावेश आहे. तसेच, पक्षाच्या महिला, अल्पसंख्याक, ओबीसी आणि युवक आघाड्यांमधील नेत्यांनाही प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री नवाब मलिक, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक-शेख, आमदार झिशान सिद्दीकी, अल्पसंख्याक नेते मुश्ताक अंतुले, हाजी इस्माईल शेख यांचाही स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे. याशिवाय, विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधित्व करणारे नेते या प्रचारात सहभागी होणार आहेत.
ग्रामीण भागातील सत्ता टिकवण्यासाठी आणि नव्याने बळकावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ही आक्रमक रणनीती आखल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. विशेषतः महापालिका निवडणुकांनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांचा फायदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये करून घेण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये ग्रामीण भागावर वर्चस्व मिळवण्यासाठी चुरस वाढली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेली ही स्टार प्रचारकांची यादी आगामी निवडणुकांमध्ये पक्ष किती आक्रमकपणे उतरणार आहे, याचे स्पष्ट संकेत देणारी ठरत आहे.