सध्या राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकलेले पाहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर अनेक पक्षप्रवेश देखील होत असल्याच्या बातम्या कानावर पडत आहेत. निवडणुकींपुर्वीच राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली. दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याची घोषणा मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केली.
अशातच आता राजकीय वर्तूळात खळबळ करणारी बातमी समोर आली आहे. दोन भावांनंतर आता भाचा पुतण्या एकत्र येणार आहेत. आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत जाण्यास नकार देत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचं निश्चित झालं असून मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने एकत्र निवडणूक लढवण्यात येणार आहे. चंदगडमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे आता या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
भाजप स्थानिक निवडणुकीत राष्ट्रवादीला विचारातच घेत नसेल तर जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा नेता म्हणून एकाकी पाडणे शक्य नाही, काही निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळेच, आघाडी स्थापन करुन निवडणुका लढविण्याचा निर्णय घेत असल्याचं हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना म्हटलं.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंदगडमधील कुपेकर गट आणि राजेश पाटील यांना एकत्र आणल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चंदगडमध्ये युती झाली तशी राज्यात अजूनही काही ठिकाणी युती होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.